Monday 21 January 2013

चाळ नावाची वाचाळ संस्कृती

         
          कॅनडामध्ये आल्यापासून भारतातल्या कित्येकतरी गोष्टी मिस करत आहे. सर्वात महत्वाची म्हणजे आमची मुंबई आणि त्या मुंबईमधली चाळ . चाळ म्हटलं की लोकांच्या अनेक समजुती आणि गैरसमजुती आहेत. काय करणार आपण त्याला?? कारण बिल्डिंग म्हटलं कि मला पाहिलं आठवतात ती बंद दार आणि त्या बंद  दारामध्ये नसलेला शेजारधर्म . कदाचित मी चुकीचा असेन, कदाचित म्हणून काय चुकीचाच असेन.कारण आमच्या जन्मापासूनच आतापर्यंतच  आयुष्य ह्या चाळीतच घडल आहे .आम्ही कधी बिल्डिंग मधल आयुष्य अनुभवलं नसेल  म्हणूनच ही  मत बनली असतील. तसचं  काहीस बाकी लोकांच  असेल ज्यांनी कधी चाळीतल जीवन पाहिलं नाही त्यांच्या मनात काही गैरसमजुती असतील . त्याबद्दल मला तरी कधी वाईट वाटल नाही उलटपक्षी चाळीतल जीवन त्यांना उलगडून सांगताना एक वेगळा आनंद मिळतो....

           लालबाग-परळ सारख्या ठिकाणी असणारी अनेकमजली चाळ किंवा उपनगरात वसलेल्या हजारो बैठ्या चाळी असोत, चाळ म्हणजे एकमेकाला लागून असलेली घरे आणि सर्वांनी वाटून घेतलेली common gallery. मी घरे म्हटले पण इथे सामान्यपणे वापरला जाणारा शब्द म्हणजे खोली होय. चाळीत सर्वात कमी गोष्ट म्हणजे इथे असणारी privacy कारण इथल्या घरांची दार सकाळपासून जी सताड उघडी असतात ती रात्री सरळ दहा वाजेपर्यंत अपवाद मात्र दुपारच्या अनेक साऱ्या गृहिणीची वामकुक्षीची वेळ असते . चाळीतल्या अनेक साऱ्या घरांमध्ये एकापेक्षा जास्त बिऱ्हाड  राहत असतात.त्यामुळेच adjust करण हे भागच पडत. मी तर म्हणेन कि जसा अभिमन्यु युद्धाच शास्त्र त्याच्या आईच्या पोटातच शिकून आला होता तसच इथे जन्माला येणार प्रत्येक मुल हे adjust करण्याच बाळकडू शिकूनच आलेलं असत.कित्येक साऱ्या गोष्टींसाठी तुम्हाला चाळीत adjust कराव लागत हे चाळीत राहिल्याशिवाय नाही समजणार आणि काही काही वेळा त्यात खूप आनंदही  मिळतो.आजकाल मी पाहिलं आहे की कित्येक साऱ्या   तरुणांची चाळीत राहण्यावरूनच लग्न रखडली आहेत. काही काही तरुण मुली मुलगा चाळीत राहतो ह्या कारणावरून नाक मुरडतात आणि मुलाचे शिक्षण, नोकरी इत्यादी गोष्टी चांगल्या असूनही नकार देतात.प्रत्येकच्या काही अपेक्षा असतात हे मी समजू शकतो पण आमच्या चाळींमध्ये जसे काही तोटे आहेत तसेच इथे प्रत्येक हाकेला धावून येणारी माणसेही आहेत.फक्त थोडीसी adjustment करावी लागतेच कारण चाळीत राहण्यासाठी हेच पहिले आवश्यक असत.

           लहानपणापासून जर घरी नावडती भाजी बनवली असेल तर शेजारच्या काकींकडे जाऊन त्यांच्याकडे बनवलेली भाजी घेऊन यायचो.जे मी अजूनही करतो .पण आजकाल साऱ्या भाज्या आवडू लागल्या हा भाग थोडासा वेगळाच आहे. दरवर्षी दिवाळीच्या पहिल्यादिवशी  आपल्या घरातला फराळ संपूर्ण चाळीत वाटून यायचा ह्याची आम्हा साऱ्या लहान मुलांमध्ये जणू काही स्पर्धाच  लागायची.मला  अजूनही आठवत आहे काही वर्षापूर्वी घरातील सर्वजण गावी गेले होते माझ बारावीच वर्ष क्लासेस चालू असल्या कारणाने मला जाता आल नाही. वडलांनी बाहेर जेवणाकरता थोडे फार पैसे देऊन ठेवले होते.पण त्या आठ दिवसामध्ये मला एकही दिवस मला बाहेर जेवावे लागेल नाही कारण त्या आठ दिवसांची माझी जेवणाची सारी जबाबदारी आमच्या चाळीतल्या साऱ्या काकींनी वाटून घेतली होती.चाळीतल कोणी गावावरून आलाच कि फणसाचे गरे ,आंबे ,शेंगदाण्याचे लाडू इत्यादी सार आपल्या घरी कधी आणून देतात ह्याची आतुरतेने वाट पाहतात.काहीना थोडासा हावरेपणा वाटेल हा पण आम्ही चाळकरी हक्काने सार  काही वाटून घेणारे मग ते सुख असू देत किंवा दुखहि असू देत. चाळीत सारे काही असे सुखाने नांदतात अस नाही तर काही क्षुल्लक कारणावरून भांडतील आणि एकमेकांच्या मागच्या पिढीचा उद्धारही करतील.मात्र जेव्हा कधी गरज असते तेव्हा हीच माणस सार काही विसरून पहिले धावून येतील.

          चाळीमध्ये आजही सालाबादप्रमाणे  होळी,गणेशोत्सव आणि सत्यनारायणाची पूजा हे खूप धुमधामामध्ये साजरे केले जातात.काही दिवसापूर्वी मी भारतात येउन गेलो तेव्हा आमच्या चाळीत सत्यनारायणाच्या पूजेची तारीख ठरली. तसा एक महिन्याचा अवकाश होता पण तिथल्या चिल्लर पार्टीमध्ये जो काही उत्साह  होता तो तर एकदम वाखाणण्याजोगा होता. कारण स्वतच्या अंगातील कला लोकांपुढे सदर करण्याच एक हक्काच अस व्यासपीठ त्यांना पूजेच्या करमुणकीच्या कार्यक्रमांमधून मिळत असत. महाराष्ट्रातील अनेक सारे कलावंत असाच साऱ्या प्रोत्साहनाने पुढे आले आहेत. कधीही कुठेही तुमच कौतुक होऊ देत पण घरच्या आपल्या माणसांकडून मिळालेली कौतुकाची थाप हि खूप जास्त महत्वाची वाटते.आमच्या चाळीतील अनेकांच्या मध्यमवर्गीय प्रवासाने त्यांना आज चांगली आर्थिक  सुबत्ता दिली.चाळीची लागलेली सवय मात्र ह्या चाळीतील रहिवाशांना एकमेकांपासून दूर घेऊन जात नाही .

          काळानुसार आमच्या चाळीसुद्धा आजकाल बदलू लागल्या आहेत. पुनर्विकासाच्या नावाखाली इथे मोठे मोठे tower उभे राहत आहेत. त्याकरता बिल्डरांकडून खेळल्या  जाणाऱ्या राजकारणामुळे
इथल वातावरण ढवळून निघत आहे. सारी काही  समीकरण बदलत आहे .काही पैशांच्या लोभापायी माणस दुरावली जात आहेत. उद्या भविष्यात अशा हजारो चाळी पुनर्विकासाच्या नावाखाली पडून त्या जागी tower दिसतील पण  "चाळ नावाची वाचाळ संस्कृती" प्रत्येकाच्या मनात घर करून राहू देत हेच नेहमी वाटत आहे.

13 comments:

  1. हम्म ..मस्तच ..खूप साऱ्या आठवणी ताज्या झाल्या..लहानपण चाळ आणि बिल्डींग या दोन्हीमध्ये एकत्रित गेल्यामुळे .. ;) चाळीतलं वातावरच काही वेगळ असत..ती देवाण घेवाण ,ते नवीन नवीन खेळ ,प्रत्येक उत्सव साजरा करण्याचा उत्साह..सगळच काही.. :)

    ReplyDelete
    Replies
    1. हम्म तू दोन्ही बाजू पहिल्या आहेत ....
      धन्यवाद प्रतिसादाबद्दल !!!!!!

      Delete
  2. Hey.. me aapli juni shejari.. khupach mast lihilay.. keep it up..

    ReplyDelete
    Replies

    1. धन्यवाद प्रतिसादाबद्दल सुलभा !!!!!!
      हो तू तर माझी जुनी शेजारी तू तर आपल्या चाळीतली मज्जा पहिलीच आहेस ..
      तुमच्या इंग्लंड मध्ये आहेत का अशा चाळी !!!!

      Delete
  3. खरं आहे...मोठमोठे टॉ व र्स उभे रहातील खरे...पण आडल्यानडल्या वेळी अवेळी धावून येणारी माणसं त्या गगनचुंबी इमारतीत शोधून सापडणार नाहीत !
    मी स्वत: अगदी राहिले नाहीये चाळीत परंतु, बरेच मित्रमैत्रिणी रहात असल्याने जाणं येणं मात्र फार होतं. त्यामुळे 'चाळ नावाच्या वाचाळ संस्कृती'ची जवळून ओळख खूप आहे. तिथले गणेशोत्सव, सार्वजनिक कार्यक्रम...खालील चौकात पांढऱ्या पडद्यावर रात्ररात्र जागून बघितलेले सिनेमे....हे आणि बरंच काही.
    आठवणी जागा झाल्या. :) :)

    ReplyDelete
  4. धन्यवाद अनघा ताई !!!!
    तू बोललीस ते खर आहे पुनर्विकासाच राजकारण आम्ही सारी तरुण मंडळी जवळून पाहत आहोत...
    तेव्हा अस वाटत त्या गगनचुंबी इमारतीपेक्षा आमच्या चाळीच बऱ्या कारण मग माणसांचे हात आभाळाला टेकतील ना :)

    ReplyDelete
  5. छान लिहिलं आहे... मी पुण्यात चाळीत राहते.... इथे common gallery नाहीये... बैठी घरे आणि फक्त दोन घरांच्या भिंती common आहेत.... पण दार बंद वगैरे नसतच कधी कोणाचं. पण हल्ली प्रत्येक जण स्वत:चं घर ३-४ मजली करण्याच्या मागे लागलाय त्यामुळे इथलीही चाळीची मजा हरवत चालली आहे....

    ReplyDelete
  6. धन्यवाद !!!! तेच मजा हरवत आहे त्यामुळेच खूप जास्त वाईट वाटत ..
    काळासोबत सार बदलत आहे फक्त माणस बदलायला नकोत हेच वाटत आहे ...

    ReplyDelete
  7. वाह..मित्रा..सुरेख मांडणी..ब्लॉग वाचताना शाळेतल्या दिवसातल्या ..तुझ्या चाळीत आम्हा मित्रांचा वावर आठवूंन गेला

    ReplyDelete
  8. वाह..मित्रा..सुरेख मांडणी..ब्लॉग वाचताना शाळेतल्या दिवसातल्या ..तुझ्या चाळीत आम्हा मित्रांचा वावर आठवूंन गेला

    ReplyDelete
  9. छानच.
    मी कधीच चाळीत राहिले नाही. फक्त तिच्याबद्दलच्या सुरस कथा ऐकत राहिले. पुण्यातले काका काही काळ चाळीत रहायचे. सुट्टीत त्याच्याकडे जाणं व्हायचं तोच काय तो चाळीशी परिचय. पण मला चाळ जीवनाबद्दल एक सूप्त आकर्षण आहे नक्की

    ReplyDelete