Sunday, 5 February 2017

पुन्हा एकदा .... नवी सुरुवात

तब्बल ३ वर्षानंतर मी आज पुन्हा काहीतरी लिहितोय . हे लिहावंसं वाटण खूप खास आहे . कारण ३ वर्षात आयुष्यात अनेक सारे बदल घडले "कुछ पाया कुछ खोया". तीन वर्षात इथे न लिहिण्याची अनेक कारणे होती पण आता असं काय घडलं ज्यामुळे मला इथे पुन्हा लिहावंसं वाटलं ?? 

मी ब्लॉग सुरु केला ह्याचा मुख्य कारणच मला कुणीतरी नोटीस करावं माझं लिखाण किंवा विचार मला हवा त्या व्यक्तीपर्यंत पोहोचावेत असंच काहीस होत . आता हे चूक कि बरोबर हे नाही माहित आणि त्यावर जास्त विचार करण्याची सुद्धा जास्त इच्छा नाही .हळूहळू मग तो उत्साह कमी होत गेला आणि इथे येणं, लिखाण करणे बंद झाले . मधल्या काळात मी सोशल मीडिया वर अनेक ठिकाणी खूप वाचत होतो , पण तिथे स्वतः लिहावं असं वाटत नव्हतं. कारण सुरुवातीचे काही प्रयत्न मनासारखे झाले नाहीत .

परंतु काही महिन्यापूर्वी माझ्या पत्नीने मला फेसबुक वरच्या एका समूहावर वर जॉईन होण्यास सुचवलं . तिथेही मी नेहमी सारखा वाचकच होतो परंतु समूहाची एक वेगळी अट होती . प्रत्येकाने काहीतरी लिहीत राहायला हवं किंवा व्यक्त व्हायला हवं नाहीतर समूहातून नारळ दिला जाईल . त्यामुळे मी लिहिण्यास सुरुवात केली आणि थोड्याच दिवसात मी तिथे नेहमी लिहायला लागलो . प्रतिसाद सुरुवातीला नाही मिळत असला तरी नकारात्मक प्रतिक्रिया नाही आल्या . त्यामुळे मला नेहमी नवीन लिहिण्याची चटक लागली . मिळेल त्या फावल्या वेळेत मी लिखाणाबद्दल विचार करू लागलो . लिखाणाचा दर्जा कितपत होता हे माहित नाही पण मी सुचेल ते लिहीत होतो .
माझ्या दिवसभरातल्या गंमतीदार घटना , पूर्वीचे किस्से , लेकीचे किस्से , शनिवार रविवारचे नवीन पदार्थ बनवण्याचे प्रयत्न मी शेअर करत होतो . परंतु काही कारणामुळे तो समूह बंद करावा लागला . माझ्यासाठी खरंच एक धक्का होता . कारण आता कुठे पुन्हा एकदा सुरुवात झाली होती आणि असं अचानक समोर आलं कि काही क्षण सुचलंच नाही . माझं लिखाण पुन्हा बंद पडेल असं वाटलं पण एक सकारात्मक  विचार केला. मी पुन्हा लिहून व्यक्त होणे हि त्या समूहाची देणं होती . तो समूह आज जरी नसेल तरी त्याने मला एका आत्मविश्वास पुन्हा मिळवून दिला होता . मी लिहिण्यास पुन्हा सुरुवात करण्यासाठीच सार काही घडलं असं वाटलं .
किनाऱ्यावर चालताना क्षणभर लाटांचा स्पर्श तुम्हाला होऊन जातो पण त्या लाटेतच त्या महासागराचे अस्तित्व असतं  . तसंच काही माणसे , काही गोष्टी आपल्या आयुष्यात खूप कमी कालावधीसाठी येतात आणि आयुष्यभर पुरेल असं काहीतरी देऊन जातात .
मी सुद्धा सार काही त्याच अर्थाने समजून घेऊन पुढे जाण्याचं ठरवलं आहे . बघूया किती जमेल , कस घडेल ..

तो समूह एका व्यक्तीसाठी कुटुंब होता आणि आम्हा सर्वासाठी कुटुंब होता. आता मी त्या कुटुंबाबद्दल जास्त काही लिहू शकत नाही पण वेळ आली कि नक्की लिहेन !!!

Tuesday, 10 June 2014

नियती ...

नियती कधी कशी वागेल तुम्ही सांगू शकत नाही ती तुमच्या आयुष्यासोबत
समांतर चालत असते . वाऱ्यासारख तीच अस्तित्व जाणवत असत . कधी रणरणत्या
उन्हात वाऱ्याची  झुळूक  मनाला तृप्त करून जाते तर कधी सोसाट्याचा वारा
सुटल्यावर घर उध्वस्त  करून जातो . नियती पण रंकाला  राजा बनवते आणि कधी
क्षणात होत्याचे नव्हते करून जाते.
आपण सारी स्वप्न सजवतो पण नियतीच्या मनात काय चाललं  आहे ह्याचा आपणास मागमूसही नसतो. सार काही सुरळीत चालू
असताना नियतीच वागण आपल्याला जाणीव करून देत कि ह्या विश्वापलीकडे
सुद्धा एक शक्ती आहे ज्याच्या  तालावर आपल आयुष्य चालू आहे.असं  जरी असल
तरी ह्याचा अर्थ हा नाही कि आयुष्याचा खेळ खेळायचाच नाही. उलट  नियतीच्या
खेळाला धैर्याने ,संयमाने तोंड द्यायचं आणि विस्कटलेला  डाव सावरायचा
आणि पुन्हा उभं राहायचं . कधी न कधीतरी नियतीचे फासे आपल्या बाजूने
नक्कीच पडतील .....

 यशवंत

Saturday, 9 March 2013

कुठेतरी दुरवर ...................



कुठेतरी दुरवर जायचं आहे
सावलीची सुद्धा आशा नाही
पाय नेतील तिथवर चालायचं
थांबतील तिथे थांबायचं.........
वाटेत अनोळखी भेटतील
जे जीवलग बनुन जातील
पण जीवलग भेटून सुद्धा कधी
अनोळखी बनुन राहतील.........
रस्त्याच्या कडेला कधी
विसावा म्हणून पडायचं
पुन्हा ऊन वारा सोसत
मात्र एकट्यान घडायचं..........
कुठेतरी दुरवर जाऊन
एखाद्या वळणावर  माग वळून पाहायचं
कितीही दुरवर आलो तरीही
तुझ्या मनात मात्र कायम राहायचं

यशवंत

Wednesday, 23 January 2013

मृगजळ- एक आभास

    पूर्वी लहान असताना मृगजळ नावाची कविता बालभारतीच्या पुस्तकात होती. कवीच नाव आणि  कवितेच्या ओळी सुद्धा  आता आठवत नाही आहेत.हा पण मी तेव्हा प्राथमिक शाळेत असेन तेव्हा कधीतरी होती नेमकी इयत्ता नाही सांगता येत. आमच्या बाईंनी खूप छान शिकवलं होत पण सार काही डोक्यावरून गेल होत. आम्हीच कुठे तरी कमी पडलो कारण त्या वयापर्यंत बाई खूप चांगल्या  शिकवायच्या नंतर मात्र हळूहळू शिंग फुटायला लागली.तो भाग तसा वेगळा आहे. खर म्हणजे  वाळवंट आणि त्यात मृगजळाच्या आशेमागे धावणाऱ्या हरणाची कविता होती .आम्ही पडलो मुंबईतले जिथे पावसाची चांगलीच कृपा आहे त्यामुळे वाळवंट आम्हाला फक्त भूगोलाच्या पुस्तकापर्यंतच माहित होत. जिथे वाळवंटच माहित नाही तिथे मृगजळ समजणे थोड अवघड गेल होत.परीक्षेपर्यंत थोडासा पोटापाण्याचा अभ्यास करून आम्ही त्या मृगजळाच्या फेऱ्या मधून बाहेर पडलो होतो.

          परीक्षा देऊन आम्ही पास होत गेलो वरच्या इयत्तेमध्ये गेलो.वयानुसार थोडी आकलनशक्ती सुधारली होती.घरात केबल आली आणि डिस्कवरी चैनल मधून आफ्रीकेमाधली वाळवंट समजले . त्यातच आम्ही  पहिल्यांदा मृगजळ म्हणजे काय आणि ते बिचारे तहानलेले हरण  पाण्याच्या आशेने कसे धावते हे पाहिले . तेव्हा ह्या मृगजळाचा खेळ फक्त पहिला पण समजून नाही घेतला. खेळ खेळणारे तेच पण खेळाचे नियम वेळोवेळी बदलत होते.

          लहानपणी आई-बाबा परीक्षेत चांगल्या नंबरने पास हो मी तुला सायकल आणून देईन सांगायचे आणि आम्ही मग सर जग एकटवून अभ्यासाला लागायचो . पूर्वी जग खूप लहान होत हो त्यामुळे जमून जायचं. आता जग पालथ घालतो पण जग एकटवन नाही जमत. असो .. हा आम्ही मात्र दिवस-रात्र एक करून अभ्यास करायचो आणि निकालाची वाट पाहायचो. तो पर्यंत वेगवेगळ्या सायकलची माहिती काढून तयार असायचो.निकालाच्यादिवशी चांगला नंबर मिळाला कि धावत जाऊन बाबांच्या समोर हजर व्हायचो.त्यानंतर शाबासकी मिळायची आणि सोबत पगार झाल्यावर सायकल घेण्याच आश्वासन असायचं. पगार झाला कि कसा लगेच संपतो आता कळतंय पण तेव्हा बाबांचा पगार झाला म्हणजे आमचे सगळे बेत आखले जायचे. त्यामुळे सायकल मिळेपर्यंत सुट्टी संपायची आणि पुढच वर्ष चालू व्हायचं. पण आश्वासन पूर्ण व्हायचं नाही आणि परत तो त्या मृगजळामागचा पाठलाग सुरु व्हायचा.

          कॉलेज मध्ये गेल्यावर आयुष्य जरा नव्याने कळू लागल होत. आयुष्याच्या सीमा थोड्या का होईना पसरत होत्या.मनात एक प्रचंड उर्जा आणि करून दाखवण्याची जिद्द होती. शारीरिक बदलासोबत असे मानसिक बदल घडून येतात जे अत्यंत नाजूकपणे सांभाळणे गरजेचे असते .परिस्थिती आपण बदलू शकतो असा आत्मविश्वास असतो.प्रत्येक तरुण-तरुणी  हे त्यांच्या मनाचे राजे असतात. आत्मविश्वाच्या अश्वावर स्वार होऊन जग जिंकायचं असत.बाहेरच जग खुणावत असत.ह्यातच कॉलेजची  वर्ष निघून गेली आणि कॉलेज संपता संपता मात्र साऱ्यांना  नोकरीची किंवा पुढील शिक्षणाची चिंता लागलेली होती. आमच्यासारखे ज्यांनी नोकरी धारण पसंत केली त्याचा प्रवास सुरु झाला कॅम्पस मुलाखतीच्या वाटेवर .आणि मनात परत तेच खूप साऱ्या अपेक्षा ज्या नेहमीप्रमाणे कुठे ना कुठे कमी पडतात. ज्यांना चांगली नोकरी मिळते त्यांच्या पगाराच्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत आणि नाही मिळत त्यांच्या वाटेला.....पण  हे सारेजण मग  परत मृगजळामागे धावत राहतात  जे आता नाही मिळाल अजून पुढे जाऊन मिळेल ह्या आशेने...

         नोकरी सुरु झाली थोडेफार पैसे हातात आले आणि पैशाने सार काही विकत घेऊ शकतो असा उगाचच गैरसमज मनामध्ये घर करायला लागला. नोकरी नंतर दर वर्षी होणारी अप्रेझल्स , बढती ह्या मागे धावत राहिलो. वर्ष संपल कि अप्रेझल्सचे रेटिंग पाहून , बढती झालेल्यांची यादी पाहून परत मॅनेजरशी वादविवाद स्पर्धा होते. मॅनेजरच जिंकतो ह्या स्पर्धेमध्ये हा पण बक्षिशाच पुढील्या  वर्षाच आश्वासन आपल्याला  देऊन जातो. आपण मात्र उगीचच सार काही जिंकलो ह्या आविर्भावात वावरतो.परत मग प्रवास नवीन वर्षात नवीन आव्हानाचा आणि आपण दमलेलो असलो तरी धावत राहतो. परदेशवारी खुणावू लागली तस मग त्याच्या मागे प्रयत्न चालू होतात ते झाल की  हातात का माहित कितीही पैसे आले कमी वाटू लागली . मग कंपनी बदलली आणि तिथेही जाऊन तेच आभासी जीवनाचे चक्र सुरु झाले कधी न संपणारे...........

         आजकाल जेव्हा कधीही आयुष्याकडे तिऱ्हाईतासारख पाहतो तेव्हा मला हि कवितेचा गाभार्थ आठवत राहतो . लहानपणापासून आम्ही मृगजळामागे धावतच आहोत ते आजतागायत.धावून धावून दमलोय कि कंटाळलोय ह्यात फरक करण सुद्धा जमत नाही आहे.गरजा वाढत चालल्या आहेत कि अपेक्षा हे ठरवण अवघड जात आहे.इथे रणरणत वाळवंट नाही आणि तहानही नाही आहे. इथे आहे ती भूक न संपणारी ...ह्यातून बाहेर पडण थोडफार अवघड आहे पण अशक्य मात्र नाही. तयारी हवी आहे मनाची जग एकवटण्याची , जिद्द ह्यातून बाहेर पडण्याची. धावायचं म्हणजे किती दूर पर्यंत हे स्वतःच ठरवायचं आहे. सीमारेषा कर्तुत्वाच्या पसरायच्या आहेत गरजा नाहीत.

          काही दिवसांपूर्वी माझ्या वरिष्ठ सहकार्यांना भेटलो म्हटलं आता कि गृहकर्ज तर संपवलं तर मग आता अजून एक घर बघा तर त्यांनी शांतपणे दिलेलं उत्तर मला खूप भावलं "अरे घर म्हणजे तेव्हा माझी मुलभूत गरज होती आता घेतलं तर मग चैनीचा भाग होऊन जाईल . मला आता वेळ कुटुंबाला  द्यायचा आहे मुलीला लहानच मोठ होताना पाहायचं आहे . आजकाल जाऊन रविवारचे
मुलीच्या शाळेत वाचनाचे वर्ग घेतो.वेळ काढून गावी जाऊन वाडीतल्या मुलांना संगणक शिकवतो. लहान मुलांना शिकवताना खूप आनंद मिळतो रे ." सार काही ऐकताना वाटल इथे पळताना नव्हे तर थांबण्यासाठी शक्ती हवी आहे. मृगजळाचा पाठशिवणीचा खेळत जे अडकले आहेत अशा माझ्यासारख्यांची  मला त्या हरणापेक्षा खूप जास्त दया येते. फक्त ह्या मृगजळामागे धावताना थांबण्याची ती शक्ती आम्हास मिळु देत .....

Monday, 21 January 2013

चाळ नावाची वाचाळ संस्कृती

         
          कॅनडामध्ये आल्यापासून भारतातल्या कित्येकतरी गोष्टी मिस करत आहे. सर्वात महत्वाची म्हणजे आमची मुंबई आणि त्या मुंबईमधली चाळ . चाळ म्हटलं की लोकांच्या अनेक समजुती आणि गैरसमजुती आहेत. काय करणार आपण त्याला?? कारण बिल्डिंग म्हटलं कि मला पाहिलं आठवतात ती बंद दार आणि त्या बंद  दारामध्ये नसलेला शेजारधर्म . कदाचित मी चुकीचा असेन, कदाचित म्हणून काय चुकीचाच असेन.कारण आमच्या जन्मापासूनच आतापर्यंतच  आयुष्य ह्या चाळीतच घडल आहे .आम्ही कधी बिल्डिंग मधल आयुष्य अनुभवलं नसेल  म्हणूनच ही  मत बनली असतील. तसचं  काहीस बाकी लोकांच  असेल ज्यांनी कधी चाळीतल जीवन पाहिलं नाही त्यांच्या मनात काही गैरसमजुती असतील . त्याबद्दल मला तरी कधी वाईट वाटल नाही उलटपक्षी चाळीतल जीवन त्यांना उलगडून सांगताना एक वेगळा आनंद मिळतो....

           लालबाग-परळ सारख्या ठिकाणी असणारी अनेकमजली चाळ किंवा उपनगरात वसलेल्या हजारो बैठ्या चाळी असोत, चाळ म्हणजे एकमेकाला लागून असलेली घरे आणि सर्वांनी वाटून घेतलेली common gallery. मी घरे म्हटले पण इथे सामान्यपणे वापरला जाणारा शब्द म्हणजे खोली होय. चाळीत सर्वात कमी गोष्ट म्हणजे इथे असणारी privacy कारण इथल्या घरांची दार सकाळपासून जी सताड उघडी असतात ती रात्री सरळ दहा वाजेपर्यंत अपवाद मात्र दुपारच्या अनेक साऱ्या गृहिणीची वामकुक्षीची वेळ असते . चाळीतल्या अनेक साऱ्या घरांमध्ये एकापेक्षा जास्त बिऱ्हाड  राहत असतात.त्यामुळेच adjust करण हे भागच पडत. मी तर म्हणेन कि जसा अभिमन्यु युद्धाच शास्त्र त्याच्या आईच्या पोटातच शिकून आला होता तसच इथे जन्माला येणार प्रत्येक मुल हे adjust करण्याच बाळकडू शिकूनच आलेलं असत.कित्येक साऱ्या गोष्टींसाठी तुम्हाला चाळीत adjust कराव लागत हे चाळीत राहिल्याशिवाय नाही समजणार आणि काही काही वेळा त्यात खूप आनंदही  मिळतो.आजकाल मी पाहिलं आहे की कित्येक साऱ्या   तरुणांची चाळीत राहण्यावरूनच लग्न रखडली आहेत. काही काही तरुण मुली मुलगा चाळीत राहतो ह्या कारणावरून नाक मुरडतात आणि मुलाचे शिक्षण, नोकरी इत्यादी गोष्टी चांगल्या असूनही नकार देतात.प्रत्येकच्या काही अपेक्षा असतात हे मी समजू शकतो पण आमच्या चाळींमध्ये जसे काही तोटे आहेत तसेच इथे प्रत्येक हाकेला धावून येणारी माणसेही आहेत.फक्त थोडीसी adjustment करावी लागतेच कारण चाळीत राहण्यासाठी हेच पहिले आवश्यक असत.

           लहानपणापासून जर घरी नावडती भाजी बनवली असेल तर शेजारच्या काकींकडे जाऊन त्यांच्याकडे बनवलेली भाजी घेऊन यायचो.जे मी अजूनही करतो .पण आजकाल साऱ्या भाज्या आवडू लागल्या हा भाग थोडासा वेगळाच आहे. दरवर्षी दिवाळीच्या पहिल्यादिवशी  आपल्या घरातला फराळ संपूर्ण चाळीत वाटून यायचा ह्याची आम्हा साऱ्या लहान मुलांमध्ये जणू काही स्पर्धाच  लागायची.मला  अजूनही आठवत आहे काही वर्षापूर्वी घरातील सर्वजण गावी गेले होते माझ बारावीच वर्ष क्लासेस चालू असल्या कारणाने मला जाता आल नाही. वडलांनी बाहेर जेवणाकरता थोडे फार पैसे देऊन ठेवले होते.पण त्या आठ दिवसामध्ये मला एकही दिवस मला बाहेर जेवावे लागेल नाही कारण त्या आठ दिवसांची माझी जेवणाची सारी जबाबदारी आमच्या चाळीतल्या साऱ्या काकींनी वाटून घेतली होती.चाळीतल कोणी गावावरून आलाच कि फणसाचे गरे ,आंबे ,शेंगदाण्याचे लाडू इत्यादी सार आपल्या घरी कधी आणून देतात ह्याची आतुरतेने वाट पाहतात.काहीना थोडासा हावरेपणा वाटेल हा पण आम्ही चाळकरी हक्काने सार  काही वाटून घेणारे मग ते सुख असू देत किंवा दुखहि असू देत. चाळीत सारे काही असे सुखाने नांदतात अस नाही तर काही क्षुल्लक कारणावरून भांडतील आणि एकमेकांच्या मागच्या पिढीचा उद्धारही करतील.मात्र जेव्हा कधी गरज असते तेव्हा हीच माणस सार काही विसरून पहिले धावून येतील.

          चाळीमध्ये आजही सालाबादप्रमाणे  होळी,गणेशोत्सव आणि सत्यनारायणाची पूजा हे खूप धुमधामामध्ये साजरे केले जातात.काही दिवसापूर्वी मी भारतात येउन गेलो तेव्हा आमच्या चाळीत सत्यनारायणाच्या पूजेची तारीख ठरली. तसा एक महिन्याचा अवकाश होता पण तिथल्या चिल्लर पार्टीमध्ये जो काही उत्साह  होता तो तर एकदम वाखाणण्याजोगा होता. कारण स्वतच्या अंगातील कला लोकांपुढे सदर करण्याच एक हक्काच अस व्यासपीठ त्यांना पूजेच्या करमुणकीच्या कार्यक्रमांमधून मिळत असत. महाराष्ट्रातील अनेक सारे कलावंत असाच साऱ्या प्रोत्साहनाने पुढे आले आहेत. कधीही कुठेही तुमच कौतुक होऊ देत पण घरच्या आपल्या माणसांकडून मिळालेली कौतुकाची थाप हि खूप जास्त महत्वाची वाटते.आमच्या चाळीतील अनेकांच्या मध्यमवर्गीय प्रवासाने त्यांना आज चांगली आर्थिक  सुबत्ता दिली.चाळीची लागलेली सवय मात्र ह्या चाळीतील रहिवाशांना एकमेकांपासून दूर घेऊन जात नाही .

          काळानुसार आमच्या चाळीसुद्धा आजकाल बदलू लागल्या आहेत. पुनर्विकासाच्या नावाखाली इथे मोठे मोठे tower उभे राहत आहेत. त्याकरता बिल्डरांकडून खेळल्या  जाणाऱ्या राजकारणामुळे
इथल वातावरण ढवळून निघत आहे. सारी काही  समीकरण बदलत आहे .काही पैशांच्या लोभापायी माणस दुरावली जात आहेत. उद्या भविष्यात अशा हजारो चाळी पुनर्विकासाच्या नावाखाली पडून त्या जागी tower दिसतील पण  "चाळ नावाची वाचाळ संस्कृती" प्रत्येकाच्या मनात घर करून राहू देत हेच नेहमी वाटत आहे.

Friday, 28 September 2012

वेडी मीरा


तुझ्या प्रीतीत रंग भरावे मी
तुझी वेडी मीरा ठरावे मी

खेळ आयुष्याचा जिंकता जिंकता
तुझ्यासोबत एकदा हरावे मी

परतून येशील ना रे आता
किती आठवणीत झुरावे मी

निसटुनी जाती रेशीमबंध सारे
हृदयाशी त्यांना घट्ट धरावे मी

पुरे झाले आता दु:खाचे निखारे
तुझ्यासाठीच ह्या जगी उरावे मी.........

यशवंत

Thursday, 6 September 2012

त्रिकोणी चौकट...... ( भाग - 3 )


त्रिकोणी चौकट......
त्रिकोणी चौकट...... ( भाग - २ )


          अचानक जोराने वाजलेल्या हॉर्नमुळे विवेक भानावर आला. आपण आयुष्याची पानं पालटून खूप मागे गेलो होतो हे त्याच्या ध्यानात आलं. घड्याळात पाहिलं तर एक वाजून गेला होता आणि रस्त्यावरची वाहतूक काही कमी झाली नव्हती. आजकाल त्याच्या मनाच सुद्धा तसाच झाल होत.. अनेक सारे विचार त्याच्या मनात रेंगाळत असायचे. सोनिया, परी, ऑफिस आणि अर्पिता..
       अर्पिताचा विचार त्याच्या मनात आला आणि त्याला त्यादिवशी भेटायला आलेली अर्पिता आठवली. काहीही करून विवेकला मिळवायचं असच ती त्यादिवशी ठरवून आली होती. सार काही मनात मांडून ती विवेक समोर उभी होती. बाकी होत ते फक्त विवेकला सांगायचं. हळू हळू अर्पिताने सार काही विवेकला सांगायला सुरुवात केली.अर्पिताच्या मनातले सारे विचार ऐकून विवेकला धक्का बसला होता. विवेक सोनियासोबत जी स्वप्न पाहत होता त्यात अर्पिताची जागा कुठेच नव्हती आणि विवेकने सुद्धा क्षणार्धात अर्पिताला नकार दिला. त्यानंतर निघून गेलेली अर्पिता अनेक वर्ष सोनिया आणि विवेकच्या संपर्कात आलीच नाही...दिवसामागून दिवस गेले विवेकने सोनियाला त्याच्या प्रेमाची कबुली दिली त्यानंतर घरातल्याच विरोध असूनही दोघांनी लग्न केल.. दोघांचा संसार फुलू लागला होता.. काही वर्षानंतर सोनियाने एका गोंडस मुलीला जन्म दिला. सार काही एखाद्या चित्रपटातल्या गोष्टीसारख सुरळीतपणे चालू होत...
         त्यांच्या त्या संसाराला कुणाची नजर लागली काय माहित.. ऑफिस वरून येताना परीला पाळणाघरातून घेऊन जायचं हा सोनियाचा दिनक्रम ठरलेला होता.ऑफिस वरून निघायच्या आधी सोनियाने विवेकला फोन केल..
"हेल्लो, मी निघाली आहे .."
"एवढ्या लवकर निघालीस ..आजकाल काम कमी आहे वाटत..!! " विवेक सहजच चिडवण्यासाठी बोलला...
"हो तुला काय माहीत माझी काम.. तू तर आपल ऑफिसच काम घेऊन बसतोस दिवसभर. "
"हो का राणीसरकार.. "
"आता काही लाडीगोडी लावायची गरज नाही आहे "
मी फक्त एवढंच सांगायला फोने केला कि मी निघत आहे ..जाताना परीला घेऊन जाईन तू पण निघ लवकर उशीर करू नकोस .."
"हो ग, निघेन लवकर तू ..सांभाळून जा .."
"बाय ."
"बाय ."
विवेकने फोन ठेवला आणि तो स्वतच्या कामाला लागला. बाईसाहेबांचा परत फोन येईलच, परी भेटल्यावर ..तेव्हा बोलूच .. असा विचार करून तो कॉफी आणण्यासाठी गेला.
कॉफी पीत पीत त्याने कामाला सुरुवात केली परत एकदा..  पण आज त्याच तसं लक्ष लागत नव्हत कामात.. पण हे presentation काहीही करून दोन दिवसात client ला द्यायचच होत.
थोड्या वेळाने त्याच्या मोबाईलची रिंग वाजली आणि  त्याने नंबर पाहिला तर अनोळखी होता. संध्याकाळी अनोळखी नंबर वरून कोण बर फोन करत असेल असा विचार करतच त्याने उचलला.
"हेल्लो,  विवेक?? "
"हां बोला,  कोण बोलत आहे? "
"मी आरती, परीच्या पाळणाघरातून बोलत आहे ..तुम्ही जरा इथे याल का? "
"मी???? " "का? काय झाल? आणि असाही सोनिया येतच आहे परीला न्यायला तिकडे ! "
"पण तुम्ही इथे येन गरजेच आहे ..."
"हो पण काय झाल ते तरी सांगाल का ???"
"तुम्ही इथे या मगच मी तुम्हाला सांगू शकते. "
आता काय झालं ह्या बाईला कि मला फोन करून बोलावत आहे. सोनियाला फोन करून बघू ती काय बोलते मग ठरवू जायचं कि नाही.विवेकने सोनियाला फोन केला पण सोनिया फोनच उचलत नव्हती. ठीक आहे बघू काय झाल असेल.. नाहीतर एवढ्या तातडीने आपल्याला बोलावणार नाहीत...काम बघू उद्या सकाळी येऊन करू...
परीला काही बर वाईट तर झाल नसेल ना ..शंकेची पाल त्याच्या मनात चुकचुकली पण असा वाईट विचार आपण का करत आहे असे बोलून विवेक सरळ परीच्या पाळणाघराच्या दिशेने निघाला ....

क्रमश....