Sunday, 19 November 2017

बॉलीवूडचे तारे - संजय मिश्रा

     बॉलीवूडच्या चमचमत्या दुनियेत सुंदर दिसणे खूप जास्त महत्वाचे मानले जाते . गेल्या काही वर्षात मात्र हे सारी समीकरण बदलत चालली आहेत . आलिशान बंगले ,इंपोर्टेड गाड्या , सुटमधे झोपणारे अभिनेते हे फक्त काही निवडक निर्मात्यांच्या चित्रपटामधूनच दिसत आहे . सिनेमा अधिकाधिक सत्य जीवनाच्या जवळ चालला आहे  आणि ह्यामुळेच तुमच्या आमच्या सारखे दिसणारे , वावरणारे अभिनेते पडद्यावर ठळकपणे उठून दिसत आहेत . संजय मिश्रा असेच गेली अनेक वर्षे सिनेमा क्षेत्रात असून सुद्धा लोकांना आठवत नसेल पण गेली २-३ वर्षे संजय यांनी एक हाती सांभाळलेले सिनेमे वाखाणण्याजोगे आहेत .बॉक्स ऑफिसवर किती कमाई केली गेली हे आकडे फुगवून सांगता येतील पण करोडो लोकांच्या मनात स्थान निर्माण करण खूप जिकरीचे काम आहे . प्रत्येकवेळी आपल्या कामाने लोकांच्या अपेक्षा उंचावत जाणे हीच तुमच्या कामाची खरी पोचपावती असते .
संजयचा जन्म ६ऑक्टोबर १९६३ साली झाला. त्याचे बरेचसे बालपण बनारस मध्ये गेले . त्याच्या घरात सरकारी नोकरीचा वारसा होता . त्याचे आजोबा जिल्हा दंडाधिकारी आणि वडील माहिती आणि दूरसंचार विभागात कार्यरत होते संजयची आजी पटना रेडिओ स्टेशन वर गाणे गात असे आणि तिचाच जास्त प्रभाव संजयवर पडला . संजयच्या वडलांना सुद्धा कलासाहित्यामध्ये रुची होती आणि त्यानिमित्त घरी होणाऱ्या मैफिलींमुळेच आपणही ह्यात काहीतरी करावे असे संजयला वाटू लागले. दहावीच्या परीक्षेत संजय दोन वेळा नापास झाला. त्यानंतर त्याने NSD बद्दल ऐकलं आणि त्यामध्ये प्रयत्न करायचे ठरवले . NSD मध्ये शेवटच्या वर्षाला असताना इरफान खान आणि संजय दोघेही एकत्र होते . 
    १९९१ मध्ये मुंबईमध्ये आल्यावर त्याला कुणी अभिनेता म्हणून घेतील असे त्याला वाटत नव्हते म्हणून कॉमेडियन ,खलनायक असे रोल करायला सुद्धा तो तयार होता पण त्यापैकी एकही रोल त्याच्या पदरात पडत नव्हता . त्यामुळे त्याने पडद्यामागच्या अनेक साऱ्या भूमिका केल्या कॅमेरा ते कला दिग्दर्शन ह्या सगळ्यामध्ये त्याने काम केले . काही दिवस वडापाव खाऊन तो राहिला हि गोष्ट तो अनेकदा अभिमानाने सांगतो . घराची आठवण आली कि अंधेरी स्टेशनवर जाऊन राजधानी एक्सप्रेसला पाहून रडत असे . त्यावेळी त्याचे आईवडील दिल्लीमध्ये स्थायिक होते .उमेदीच्या काळात अनुभवाने तो खूप काही शिकत गेला आणि हाच सारा अनुभव त्याला त्याच्या सगळ्यात उत्तम अशा "आँखो देखी " सिनेमा मध्ये कामी आला .१९९१ मध्ये आलेली चाणक्य मालिका त्याच पडद्यावरच पाहिलंच काम होते . पहिल्या सीनसाठीच त्याने २८ टेक घेतले .तो एखादी स्क्रिप्ट खूप खोलात जाऊन वाचत असे आणि त्यामुळेच त्याच्या मनात असलेला चाणक्य मधला रोल आणि दिग्दर्शकाच्या मनातला रोल ह्यात खूप सारी तफावत होती . त्यानंतर स्क्रिप्ट वाचणे त्याने थांबवून जे काही दिग्दर्शक सांगेल ते करण्याचे ठरवले .

     ऑफिस ऑफिस सिनेमाच्या शूटिंगच्यावेळी संजयला पोटदुखीचा त्रास आणि त्याला दाखल करावं लागलं . १५ लिटर पाणी त्याच्या पोटामधून काढण्यात आलं आणि ह्यावेळी त्याच्या वडिलांनी खूप साथ दिली . रोज त्याचे वडील त्याच्या सोबत फिरायला जात . ह्याच दरम्यान पाटणा हॉस्पिटलचे डीन संजयकडे आले आणि त्याच्या पत्नीला संजयला भेटायचे आहे असे सांगितले .संजय त्याची स्थिती नसतानासुध्दा त्यांना भेटायला गेला . त्यांनी संजय बघून एक हास्य दिले . त्या मृत्यूच्या दारात उभ्या होत्या . एखाद्या व्यक्तीला मृत्यूच्या दारात उभं असताना आपल्याला भेटावसं वाटणं हे ऑस्करपेक्षा मोठी गोष्ट आहे असं संजयला वाटत होत .त्यानंतर संजयच्या वडिलांचा मृत्यू झाला आणि त्या नंतरच्या दुःखात तो पूर्णपणे कोलमडून गेला होता .त्यानंतर मुंबईला जाण्याऐवजी ऋषिकेशला निघून गेला . तिथे एका धाब्यावर तो ऑम्लेट बनवण्याचं काम करत होता .तिथल्या सरदार मालकाने त्याला ओळखले नाही पण तिथे येणारे ग्राहक त्याला ओळखत आणि त्याच्यासोबत फोटो काढून घेत. 
     रोहीत शेट्टीने त्याला पुन्हा सिनेमामध्ये येण्यास तयार केले आणि "ऑल द बेस्ट "  सिनेमा मध्ये घेतले. NSD मध्ये असताना तुटणाऱ्या नातेसंबंधाबद्दल अनेक कथा ऐकल्यामुळे तो लग्नापासून लांब होता .पण वडिलांच्या मृत्यनंतर आलेल्या एकाकीपणामुळे त्याच्या आईने त्याला लग्न करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर २००९ मध्ये उत्तराखंडच्या किरण सोबत लग्नच्या बेडीत अडकला .जेवण बनवणे संजयला खूप आवडते आणि त्यामुळेच जिथे कुठे शूटिंग असेल तिथे तो गॅस सिलेंडर घेऊन स्वतःचे जेवण स्वतः बनवतो . असे असाल तरी स्वतःच्या दोन मुलींसाठी(पल  ५वर्षे आणि लम्हा २ वर्षे ) तो मात्र जेवण बनवत नाही .कारण त्याच्या दोन्ही मुलींना जॅम रोटी आवडते आणि संजयच्या मते जरी आपल्या मुली असतील तरी सुद्धा तुम्ही बनवलेल्या जेवणाचा आदर राखला गेला पाहिजे .
     "ओह्ह डार्लिंग ये हैं इंडिया " मधून पदार्पण करणाऱ्या संजयने सत्या ,दिल से , बंटी बबली ,गोलमाल ,साथिया ,गुरु ,धमाल,वेलकम सारख्या बिग बजेट मुख्य प्रवाहातल्या सिनेमामध्ये काम केले. तसेच त्याने अनेक सारे सिनेमे फक्त काम करायला मिळतंय ह्या भावनेनं केले आहेत त्यातले अनेक सिनेमे प्रदर्शित सुद्धा झाले नाहीत  . फस्स गये ओबामा ,मसान ,दम लगा के हैशा ,सारे जहाँ से मेहेंगा ,मिस तानाकपुर हाजीर हो , न्यूटन  सारख्या लो बजेट सिनेमातल्या कामाचं समीक्षकांनी नेहमीच कौतुक केलं आहे. २०१४ साली प्रदर्शित झालेला आँखो देखी हां संजयच्या अभिनयच उत्कृष्ट नमुना आहे . ऑफिस ऑफिस  मालिकेटमधील शुक्लाच पात्र संजयने छान रंगवलं होत .
     संजय नेहमीच प्रेक्षकांच्या अपेक्षा उंचावत आहे आणि त्या अपेक्षांना खरा ठरत आहे . बॉलीवूड च्या चमचमत्या दुनियेत असे तारे त्यांच्या अभिनयक्षमतेने नेहमी झळाळून निघू देत ..
२४ नोव्हेम्बर ,२०१७ रोजी ग्लोबल वॉर्मिंगसारख्या गंभीर विषयावर भाष्य करणारा बॉलीवूडमधला पहिलाच सिनेमा  "कडवी हवा"  येत आहे आणि ह्या सिनेमामध्ये संजय मुख्य भूमिकेत आहे.  त्यासाठी संजयला खूप खूप शुभेच्छा !!!! 





Friday, 10 February 2017

लढाई इंग्रजीशी


 अनेकदा इंग्लिश सुधारण्यासाठी काय करावं हा प्रश्न विचारला जातो. ह्याचा अर्थ इंग्लिश येत नाही असा नसतो ,आजकाल खूप साऱ्या लोकांना इंग्लिश लिहिता वाचता येत असत पण अडचण येते ती इंग्लिश बोलताना .
काही प्रोफेशनल लोक सुद्धा त्यांच्या कामाच्या बाबतीत इंग्लिश बोलतात पण त्यांना सुद्धा दैनंदिन व्यवहारातील इंग्लिश बोलताना खूप अडचण येते . ह्याची दोन कारणे आहेत एक म्हणजे शब्द संग्रहाची कमी आणि रोजचा सवय नसणे . दोन्ही गोष्टी सहज साध्य करता येण्यासारख्या आहेत.
शब्दसंग्रह वाढवण्यासाठी वाचन करणे आणि अडलेला शब्दाचा अर्थ समजावून घेणे गरजेचे आहे. रोज काहींना काहीतरी वाचायचे वर्तमानपत्र वाचा , मासिक वाचा , फेसबुक पोस्ट वाचा पण किती वाचावं? हा प्रश्न तुम्हाला पडला असेल ना .. मग रोज नवीन १० शब्दापर्यंत अडत नाही आणि त्याचा अर्थ शोधत नाही तो पर्यंत वाचत राहावं .. एक दिवस असा येईल कि तुम्ही कोणत्याच शब्दाला अडणार नाही . पण नुसता शब्दाचा अर्थ समजावून घेणे पुरेसे आहे का ? तर नाही हे म्हणजे असं झालं कि मशीन गन आहे पण कस वापरायचं माहित नाही .
तर मग काय करावं ?? ज्या शब्दाला तुम्ही समजून घेणार आहे त्याचा वाक्यात कशाप्रकारे वापर केला आहे हे समजून घ्याच .
उदाहरण घ्याच तर "cup of tea " कोणत्या पद्धतीने वापरलं आहे हे समजून घेतलं पाहिजे त्याचा अर्थ थोडा वेगळा आहे
Action movies aren't really my cup of tea. I prefer dramas and comedies, to be honest
तर हि झाली दुसरी पायरी म्हणजे मशीन गन आणली, त्याच मॅन्युअल वाचाल कि ती कशी वापरायची पण मैदानात उतरण पण गरजेचे आहे ना ?
त्यासाठी आपण दोन गोष्टी करायच्या. पहिले म्हणजे इंग्लिश ऐकणे आणि त्यासाठी हमखास इंग्लिश सिनेमे पाहण्याचा सल्ला दिला जातो . पण सिनेमे पाहताना त्यात पहिला इंटरेस्ट वाटणे गरजेचे आहे . कारण एक तर अससेन्ट आणि एकंदर इंग्लिश सिनेमाची धाटणी पाहता भारतीय लोक खूप कमी इंग्लिश पाहतात . कारण आपल्याला सवय आहे मेलोड्रॅमिक सिनेमे पाहण्याची . आजकाल आपण वास्तवाशी निगडित सिनेमे पाहतो ..
सिनेमा आला आणि विषयांतर झालं .. असो ..तर मग काय इंग्लिश ऐकावं ?
हो एक पर्याय आहे पण त्यासाठी तुम्हाला लहान व्हावं लागेल...हो हो लहानच व्हावं लागेल कारण त्यासाठी तुम्हाला एक कार्टून पाहावं लागेल . त्या कार्टून सिरीजच नाव आहे "Peppa Pig".
"Peppa Pig" एक ब्रिटिश कार्टून आहे . संपूर्ण कार्टून एक लहान डुक्कर "पेपा" आणि तिच्या कुटुंब आणि मित्रमंडळी वर आधारित आहे. पेपाच्या रोजच्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टीवर आधारित हे कार्टून आहे . समजायला खूप साधे आणि सोप्पे इंग्लिश जे नेहमी इंटर्स्टिंग वाटते . मी अनेकदा ह्याचे १ तासाचे एपिसोडस लेकी सोबत पहिले आहे . सारे एपिसोडस youtube वर आहेत . ह्यामुळे दैनंदिन जीवनातील इंग्लिश तुम्हाला ऐकायला मिळेल आणि त्याचा सराव सुद्धा होईल .
लहान मुलांना दाखवण्यासाठी जगातलं सगळ्यात उत्तम कार्टून आहे हे असं मी छातीठोकपणे सांगू शकतो .
आता आपली युद्धात उतरण्याची वेळ आली आहे आणि युद्धात तुम्हाला पहिला हल्ला चढवायचा आहे तो तुमच्या घरातल्यांवर , तुमच्या शाळेत जाणाऱ्या लेकरांशी इंग्लिश मध्ये बोला , पार्टनर सोबत गप्पा मारा , कामाच्या ठिकाणे एखाद दोन वाक्याने सुरुवात करा ..पण कुठेही थांबू नका ..बोलत राहा ..
कुणीतरी म्हटलं आहे एकादी गोष्ट २१ दिवस नित्यनियमाने केली कि त्याची सवय लागते म्हणून फक्त २१ दिवसाचा प्रश्न आहे. तो पर्यंत तुम्हाला सुद्धाला आत्मविश्वास येईल आणि इंग्लिशची अडचण कायमची निघून जाईल ...

Sunday, 5 February 2017

पुन्हा एकदा .... नवी सुरुवात

तब्बल ३ वर्षानंतर मी आज पुन्हा काहीतरी लिहितोय . हे लिहावंसं वाटण खूप खास आहे . कारण ३ वर्षात आयुष्यात अनेक सारे बदल घडले "कुछ पाया कुछ खोया". तीन वर्षात इथे न लिहिण्याची अनेक कारणे होती पण आता असं काय घडलं ज्यामुळे मला इथे पुन्हा लिहावंसं वाटलं ?? 

मी ब्लॉग सुरु केला ह्याचा मुख्य कारणच मला कुणीतरी नोटीस करावं माझं लिखाण किंवा विचार मला हवा त्या व्यक्तीपर्यंत पोहोचावेत असंच काहीस होत . आता हे चूक कि बरोबर हे नाही माहित आणि त्यावर जास्त विचार करण्याची सुद्धा जास्त इच्छा नाही .हळूहळू मग तो उत्साह कमी होत गेला आणि इथे येणं, लिखाण करणे बंद झाले . मधल्या काळात मी सोशल मीडिया वर अनेक ठिकाणी खूप वाचत होतो , पण तिथे स्वतः लिहावं असं वाटत नव्हतं. कारण सुरुवातीचे काही प्रयत्न मनासारखे झाले नाहीत .

परंतु काही महिन्यापूर्वी माझ्या पत्नीने मला फेसबुक वरच्या एका समूहावर वर जॉईन होण्यास सुचवलं . तिथेही मी नेहमी सारखा वाचकच होतो परंतु समूहाची एक वेगळी अट होती . प्रत्येकाने काहीतरी लिहीत राहायला हवं किंवा व्यक्त व्हायला हवं नाहीतर समूहातून नारळ दिला जाईल . त्यामुळे मी लिहिण्यास सुरुवात केली आणि थोड्याच दिवसात मी तिथे नेहमी लिहायला लागलो . प्रतिसाद सुरुवातीला नाही मिळत असला तरी नकारात्मक प्रतिक्रिया नाही आल्या . त्यामुळे मला नेहमी नवीन लिहिण्याची चटक लागली . मिळेल त्या फावल्या वेळेत मी लिखाणाबद्दल विचार करू लागलो . लिखाणाचा दर्जा कितपत होता हे माहित नाही पण मी सुचेल ते लिहीत होतो .
माझ्या दिवसभरातल्या गंमतीदार घटना , पूर्वीचे किस्से , लेकीचे किस्से , शनिवार रविवारचे नवीन पदार्थ बनवण्याचे प्रयत्न मी शेअर करत होतो . परंतु काही कारणामुळे तो समूह बंद करावा लागला . माझ्यासाठी खरंच एक धक्का होता . कारण आता कुठे पुन्हा एकदा सुरुवात झाली होती आणि असं अचानक समोर आलं कि काही क्षण सुचलंच नाही . माझं लिखाण पुन्हा बंद पडेल असं वाटलं पण एक सकारात्मक  विचार केला. मी पुन्हा लिहून व्यक्त होणे हि त्या समूहाची देणं होती . तो समूह आज जरी नसेल तरी त्याने मला एका आत्मविश्वास पुन्हा मिळवून दिला होता . मी लिहिण्यास पुन्हा सुरुवात करण्यासाठीच सार काही घडलं असं वाटलं .
किनाऱ्यावर चालताना क्षणभर लाटांचा स्पर्श तुम्हाला होऊन जातो पण त्या लाटेतच त्या महासागराचे अस्तित्व असतं  . तसंच काही माणसे , काही गोष्टी आपल्या आयुष्यात खूप कमी कालावधीसाठी येतात आणि आयुष्यभर पुरेल असं काहीतरी देऊन जातात .
मी सुद्धा सार काही त्याच अर्थाने समजून घेऊन पुढे जाण्याचं ठरवलं आहे . बघूया किती जमेल , कस घडेल ..

तो समूह एका व्यक्तीसाठी कुटुंब होता आणि आम्हा सर्वासाठी कुटुंब होता. आता मी त्या कुटुंबाबद्दल जास्त काही लिहू शकत नाही पण वेळ आली कि नक्की लिहेन !!!