Wednesday 23 January 2013

मृगजळ- एक आभास

    पूर्वी लहान असताना मृगजळ नावाची कविता बालभारतीच्या पुस्तकात होती. कवीच नाव आणि  कवितेच्या ओळी सुद्धा  आता आठवत नाही आहेत.हा पण मी तेव्हा प्राथमिक शाळेत असेन तेव्हा कधीतरी होती नेमकी इयत्ता नाही सांगता येत. आमच्या बाईंनी खूप छान शिकवलं होत पण सार काही डोक्यावरून गेल होत. आम्हीच कुठे तरी कमी पडलो कारण त्या वयापर्यंत बाई खूप चांगल्या  शिकवायच्या नंतर मात्र हळूहळू शिंग फुटायला लागली.तो भाग तसा वेगळा आहे. खर म्हणजे  वाळवंट आणि त्यात मृगजळाच्या आशेमागे धावणाऱ्या हरणाची कविता होती .आम्ही पडलो मुंबईतले जिथे पावसाची चांगलीच कृपा आहे त्यामुळे वाळवंट आम्हाला फक्त भूगोलाच्या पुस्तकापर्यंतच माहित होत. जिथे वाळवंटच माहित नाही तिथे मृगजळ समजणे थोड अवघड गेल होत.परीक्षेपर्यंत थोडासा पोटापाण्याचा अभ्यास करून आम्ही त्या मृगजळाच्या फेऱ्या मधून बाहेर पडलो होतो.

          परीक्षा देऊन आम्ही पास होत गेलो वरच्या इयत्तेमध्ये गेलो.वयानुसार थोडी आकलनशक्ती सुधारली होती.घरात केबल आली आणि डिस्कवरी चैनल मधून आफ्रीकेमाधली वाळवंट समजले . त्यातच आम्ही  पहिल्यांदा मृगजळ म्हणजे काय आणि ते बिचारे तहानलेले हरण  पाण्याच्या आशेने कसे धावते हे पाहिले . तेव्हा ह्या मृगजळाचा खेळ फक्त पहिला पण समजून नाही घेतला. खेळ खेळणारे तेच पण खेळाचे नियम वेळोवेळी बदलत होते.

          लहानपणी आई-बाबा परीक्षेत चांगल्या नंबरने पास हो मी तुला सायकल आणून देईन सांगायचे आणि आम्ही मग सर जग एकटवून अभ्यासाला लागायचो . पूर्वी जग खूप लहान होत हो त्यामुळे जमून जायचं. आता जग पालथ घालतो पण जग एकटवन नाही जमत. असो .. हा आम्ही मात्र दिवस-रात्र एक करून अभ्यास करायचो आणि निकालाची वाट पाहायचो. तो पर्यंत वेगवेगळ्या सायकलची माहिती काढून तयार असायचो.निकालाच्यादिवशी चांगला नंबर मिळाला कि धावत जाऊन बाबांच्या समोर हजर व्हायचो.त्यानंतर शाबासकी मिळायची आणि सोबत पगार झाल्यावर सायकल घेण्याच आश्वासन असायचं. पगार झाला कि कसा लगेच संपतो आता कळतंय पण तेव्हा बाबांचा पगार झाला म्हणजे आमचे सगळे बेत आखले जायचे. त्यामुळे सायकल मिळेपर्यंत सुट्टी संपायची आणि पुढच वर्ष चालू व्हायचं. पण आश्वासन पूर्ण व्हायचं नाही आणि परत तो त्या मृगजळामागचा पाठलाग सुरु व्हायचा.

          कॉलेज मध्ये गेल्यावर आयुष्य जरा नव्याने कळू लागल होत. आयुष्याच्या सीमा थोड्या का होईना पसरत होत्या.मनात एक प्रचंड उर्जा आणि करून दाखवण्याची जिद्द होती. शारीरिक बदलासोबत असे मानसिक बदल घडून येतात जे अत्यंत नाजूकपणे सांभाळणे गरजेचे असते .परिस्थिती आपण बदलू शकतो असा आत्मविश्वास असतो.प्रत्येक तरुण-तरुणी  हे त्यांच्या मनाचे राजे असतात. आत्मविश्वाच्या अश्वावर स्वार होऊन जग जिंकायचं असत.बाहेरच जग खुणावत असत.ह्यातच कॉलेजची  वर्ष निघून गेली आणि कॉलेज संपता संपता मात्र साऱ्यांना  नोकरीची किंवा पुढील शिक्षणाची चिंता लागलेली होती. आमच्यासारखे ज्यांनी नोकरी धारण पसंत केली त्याचा प्रवास सुरु झाला कॅम्पस मुलाखतीच्या वाटेवर .आणि मनात परत तेच खूप साऱ्या अपेक्षा ज्या नेहमीप्रमाणे कुठे ना कुठे कमी पडतात. ज्यांना चांगली नोकरी मिळते त्यांच्या पगाराच्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत आणि नाही मिळत त्यांच्या वाटेला.....पण  हे सारेजण मग  परत मृगजळामागे धावत राहतात  जे आता नाही मिळाल अजून पुढे जाऊन मिळेल ह्या आशेने...

         नोकरी सुरु झाली थोडेफार पैसे हातात आले आणि पैशाने सार काही विकत घेऊ शकतो असा उगाचच गैरसमज मनामध्ये घर करायला लागला. नोकरी नंतर दर वर्षी होणारी अप्रेझल्स , बढती ह्या मागे धावत राहिलो. वर्ष संपल कि अप्रेझल्सचे रेटिंग पाहून , बढती झालेल्यांची यादी पाहून परत मॅनेजरशी वादविवाद स्पर्धा होते. मॅनेजरच जिंकतो ह्या स्पर्धेमध्ये हा पण बक्षिशाच पुढील्या  वर्षाच आश्वासन आपल्याला  देऊन जातो. आपण मात्र उगीचच सार काही जिंकलो ह्या आविर्भावात वावरतो.परत मग प्रवास नवीन वर्षात नवीन आव्हानाचा आणि आपण दमलेलो असलो तरी धावत राहतो. परदेशवारी खुणावू लागली तस मग त्याच्या मागे प्रयत्न चालू होतात ते झाल की  हातात का माहित कितीही पैसे आले कमी वाटू लागली . मग कंपनी बदलली आणि तिथेही जाऊन तेच आभासी जीवनाचे चक्र सुरु झाले कधी न संपणारे...........

         आजकाल जेव्हा कधीही आयुष्याकडे तिऱ्हाईतासारख पाहतो तेव्हा मला हि कवितेचा गाभार्थ आठवत राहतो . लहानपणापासून आम्ही मृगजळामागे धावतच आहोत ते आजतागायत.धावून धावून दमलोय कि कंटाळलोय ह्यात फरक करण सुद्धा जमत नाही आहे.गरजा वाढत चालल्या आहेत कि अपेक्षा हे ठरवण अवघड जात आहे.इथे रणरणत वाळवंट नाही आणि तहानही नाही आहे. इथे आहे ती भूक न संपणारी ...ह्यातून बाहेर पडण थोडफार अवघड आहे पण अशक्य मात्र नाही. तयारी हवी आहे मनाची जग एकवटण्याची , जिद्द ह्यातून बाहेर पडण्याची. धावायचं म्हणजे किती दूर पर्यंत हे स्वतःच ठरवायचं आहे. सीमारेषा कर्तुत्वाच्या पसरायच्या आहेत गरजा नाहीत.

          काही दिवसांपूर्वी माझ्या वरिष्ठ सहकार्यांना भेटलो म्हटलं आता कि गृहकर्ज तर संपवलं तर मग आता अजून एक घर बघा तर त्यांनी शांतपणे दिलेलं उत्तर मला खूप भावलं "अरे घर म्हणजे तेव्हा माझी मुलभूत गरज होती आता घेतलं तर मग चैनीचा भाग होऊन जाईल . मला आता वेळ कुटुंबाला  द्यायचा आहे मुलीला लहानच मोठ होताना पाहायचं आहे . आजकाल जाऊन रविवारचे
मुलीच्या शाळेत वाचनाचे वर्ग घेतो.वेळ काढून गावी जाऊन वाडीतल्या मुलांना संगणक शिकवतो. लहान मुलांना शिकवताना खूप आनंद मिळतो रे ." सार काही ऐकताना वाटल इथे पळताना नव्हे तर थांबण्यासाठी शक्ती हवी आहे. मृगजळाचा पाठशिवणीचा खेळत जे अडकले आहेत अशा माझ्यासारख्यांची  मला त्या हरणापेक्षा खूप जास्त दया येते. फक्त ह्या मृगजळामागे धावताना थांबण्याची ती शक्ती आम्हास मिळु देत .....

2 comments:

  1. Gelya varshi mi hey mrugajalamage dhavna thambavla... paisa ani pragati ya donhi goshti jevha samorasamor ubhya thaklya tevha mi pragati nivadli.

    Baki lekh mast jamun alay!

    ReplyDelete
  2. खर बोललास श्री ..
    अरे पैसा आणि प्रगती ह्यातला पर्याय निवडण खूप कठीण होत रे ...
    ज्याला जमला त्याने खूप काही मिळवलं

    ReplyDelete