Monday, 16 January 2012

त्रिकोणी चौकट......

      जोराने दार बंद करुन विवेक लॉंबीमधे आला. लिफ्टच बटन दाबल आणि अस्वस्थपणे लिफ्टची वाट पाहत होता.लिफ्टच्या इंडिकेटरवरचे आकडे बदलत होते १,२ ३ ..... पण २२ व्या मजल्यावर लिफ्ट यायला अजून वेळ लागला असता. तो तसाच स्टेप्सवरून  खाली धावत निघाला. खिशे चाचपले आणि गाडीची चावी काढून निघाला. बिल्डिंगच्या गेट जवळ येऊन जोरात गाडीचा हॉर्न वाजवून त्याने आणि त्या शांत मध्यरात्री गाढ झोपी गेलेल्या अनेकांची झोपमोड केली. वॉंचमेनने घाई घाई मध्येच सलाम करून बिल्डींगचा गेट उघडला आणि मनातल्या मनात विवेकला शिव्याहि दिल्या. एवढ्या मध्यरात्री कुठे निघाला आहे हा असा विचार करतच वॉंचमेन आपल्या जागेवर जाऊन झोपण्याचा प्रयत्न करू लागला.

      विवेक गेटच्या बाहेर येऊन मुख्य रस्त्याच्या दिशेने निघाला . कुठे जायचा आता हा प्रश्न त्याच्या मनात होता. कुठेतरी लांब जाव एवढंच त्याला ह्या क्षणी वाटत होत.

      पेट्रोल पंप च्या दिशेने वळून थोडस पेट्रोल गाडीत टाकून तो मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाकडे जोराने गाडी पळवत होता मधेच मागे वळूनही बघत होता. कुणी आपला पाठलाग तर नाही ना करत आहे हीच भीती त्याला सारखी सतावत होती. गाडी वाऱ्याच्या वेगाने पळत होती तसा त्याला  थोडासा गारठा जाणवू लागला होता.

      गाडी जशी जशी पुण्याच्या दिशेने पळत होती तस तस त्याच मन मागे जाऊ लागल खूप साऱ्या गोष्टी त्याच्या डोळ्यासमोर rewind होऊ लागल्या.परी, त्याच आणि सोनियाच लग्न, आई बाबांचा विरोध,नोकरी मधला struggle ,कॉलेजचे दिवस, मित्र, सोनिया आणि त्याच प्रेम,...खूप मागे चालला होता विवेक. कडू-गोड साऱ्या आठवणी  ह्या क्षणाला त्याच्या मनात एकमेकांशी जणू काही स्पर्धाच करत होत्या.....

क्रमश....

Tuesday, 3 January 2012

सौंदर्य शोधण्याची कला....

     गेले काही महिने मी सुरेश पेठे काकांची चित्रे, सुहास आणि पंकजची फोटोग्राफी, क्रांतीताईच्या  गझल आणि कविता , अनघाताई आणि महेंद्र काकांचे ब्लॉगवरचे पोस्ट ह्या सर्व गोष्टींचा मनमुराद आस्वाद घेत होतो. त्यासोबतच मनातच आपणही अस काही कराव अस नेहमी वाटत होत. प्रत्येकाची हि एक कला होती आणि त्यांच्या प्रत्येक कलाकृती मध्ये एक सौंदर्य भरलेले होते. नेहमी अस वाटत होत हे सौंदर्य देवाने त्यांनाच  दिल आहे अस आपल्याला नाही जमू शकणार.  मनात हे एकदम घर करून गेल होत.

     हळूहळू ह्या सर्वांच्या कलाकृतीचा प्रभाव मनावर पडत गेला आणि मनातले नकारात्मक विचार बदलू लागले. प्रत्येकाकडे देवाने एकच कला दिली होती ती म्हणजे आयुष्यातलं सौंदर्य शोधण्याची. उगाचच नाही हि मंडळी सर्व सामन्याप्रमाणेच रोजच्या धावपळीतून हे सर्व लोकांपर्यंत पोहचवत होते.

     सुरेश काकांची चित्रे म्हणजे त्याच्या सभोवतालच्या परिसरातलीच होती जी त्यांनी त्यांच्या रंगातून आपल्यासमोर आणली. सुहास आणि पंकजला तर ती नजर मिळाली होती जी कॅमेरा पलीकडली आहे पण सारी छायाचित्र तुम्हा आम्हा सर्वांच्या रोजच्या आयुष्यातालीच होती. क्रांतीताईच्या  गझल आणि कवितांनी आयुष्यातले अनेक सारे भाव हळुवारपणे उलगडलेले आहेत. अनघाताई आणि महेंद्र काकांच्या  पोस्ट मध्ये तर रोजच्या रुटीन प्रसंगातले  अनेक सारे पैलू बघायला मिळतात. खरच ह्या सर्वांनी आयुष्यातलं सौंदर्य शोधण्याची कला जोपासली आहे आणि त्यामुळेच आपल्याच सर्व सुंदर पाहायला आणि वाचायला मिळत आहे.

   मी आता देवाकडे एकच गोष्ट मागेन कि आता मला माझ्या आयुष्यात सौंदर्य नको आहे तर आयुष्यात जे काही आहे त्यातलं सौंदर्य शोधण्याची कला माझ्याही अंगी जोपासली जावी ....



Friday, 30 December 2011

हिशोब


चला आता वेळ आली आहे निरोप घेण्याची.. अहो तुमचा निरोप नाही तर ह्या सरत्या वर्षाचा . तुमच्या सोबत तर कायम राहायचं आहे.

 एक वर्ष संपल आणि दुसर वर्ष नवीन संधी घेऊन दारात उभ आहे .त्याच स्वागत तर करायला हव पण त्याअगोदर सरत्या वर्षाचा हिशोब एकदा मांडायला हवा.
हिशोब म्हणजे पैशाचा नाही कारण आजवर तो हिशोब कधी जमलाच नाही. गेल्या वर्षात किती कमावलं आणि किती गमावलं , किती सुख उपभोगल आणि किती दुख सहन केल ,किती माणस जोडली आणि किती माणस तुटली , ह्याचा ताळेबंद तर मांडायलाच हवा.

मागे वळून पाहिल तेव्हा हे वर्ष तस सुख देऊनच गेल, वैयक्तिक प्रगतीच झाली  पण काही आशा अजूनही मनात तशाच राहिल्या आहेत. मनाने सुद्धा अनेकदा निराशेचे सूर गायले परंतु सभोवतालच्या माणसांमुळे लढायची जिद्द अजून आहे.

वर्षभरात मनाला आनंद आणि समाधान मिळवून देणाऱ्या गोष्टी घडून आल्या. काही कविता रचल्या गेल्या , चित्रकलेमध्ये पुन्हा एकदा मन रमु लागल ,छायाचित्रणाची गोडी लागली , ब्लॉग लिहिण्यास सुरुवात केली . नव्याने जोडल्या गेलेल्या मित्र-मंडळीमुळे आणि त्याच्या मार्गदर्शनामुळे सर्व काही घडून आल.

हिशोब पहिला तर जमेच्याच बाजू आहेत सगळ्या पण मनात राहिलेल्या अपूर्ण इच्छाच काय करणार ?? हा प्रश्न सारखा मनाला टोचत आहे. निराशा एखाद्या सुनामीसारखी येते आणि क्षणात स्वप्नाचे सारे बंगले पाण्यात उद्धवस्त करून जाते . वर्ष संपल तर ह्या अपूर्ण इच्छा मागे ठेवून पुढे जायचं का?? नाही अस नाही.. तर पुढल्या वर्षात पूर्ण करण्यासाठी त्यांना पण सोबत घेऊन जायच. जगण्याची लढाई अशीच चालू ठेवायची आहे.

वर्षभरात तुम्ही जो काही प्रतिसाद दिला आणि मार्गदर्शन केल त्याबद्धल मी तुमचे आभार मानतो आणि पुढील वर्ष तुम्हा सर्वाना सुख-समृद्धीचे जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो.

Thursday, 22 December 2011

आयुष्याची समीकरणे


सोडवत आहे एकरेषीय समीकरणे
प्रतलावरती मांडुनी सुखदु:खाचे अक्ष
स्थापिला बिंदू स्वःतचा
सोबतिला जरी असतिल अनेक

                                         बिंदूमधील अंतरे नात्याची
                                         काही जवळ तर काही दूरची
                                         निघाल्या रेषा कापण्यास ही अंतरे
                                         सुखदु:खाच्या अक्षांना छेदती

गवसतील तेव्हा रेषांना
कधी कोन काटकोन त्रिकोण
आणि बदलून जाईल नशीब
मिळेल जेव्हा नवी दिशा नवा दृष्टीकोन

                                        बदलत्या नशीबासोबत बिंदूही सरकत आहे
                                        कधी पुढे-मागे कधी वरती-खालती
                                       असेच करता करता सुटतील समीकरणे
                                       उरतील हाती सुखदु:खाच्या किंमती...

यशवंत....

Wednesday, 19 October 2011

चुकीचे हिशेब

मी मांडले हिशेब नेहमी
ते सारे चुकीचे होते

ढाळले अश्रु ज्यांसमोर
त्यांना हे नेहमीचे होते

सोसले घाव सारे ते तर
माझ्या ओळखीचे होते

ना कळले सागर जे
तळ तयांचे खोलीचे होते

आर्त स्वर माझे हे
कधीतरी तुझ्या अंगणीचे होते

दुख कधी ना कळले कुणाला
कारण सारे हे माझ्या मनीचे होते

यशवंत 

Monday, 29 August 2011

एक स्वप्न आहे


 एक स्वप्न आहे
तुला
खळखळून हसताना पाहणार
तुझ्या डोळ्यातील आनंदाश्रू
बनून गालावर वाहणार

एक स्वप्न आहे
तुला हळुवार कवेत घेणार
सोबतीने तुझ्या मला
प्रीतीत चिंब भिजवणार

एक स्वप्न आहे
तुझ्या भविष्यात हरवणार
तू दूर असताना मात्र 
आयुष्य शून्य जाणवणार 


एक स्वप्न आहे
तूच सार जीवन बनून
संगतीने तुझ्या जगणार

तुझ्याच डोळ्यांनी स्वप्न पाहणारं 
एक स्वप्न आहे ......

यशवंत
 

Tuesday, 9 August 2011

आपण

एकमेकांचा निरोप घेताना लपवले ते भाव आपण
दूर जाताना पुन्हा एकदा जवळ आलो तेच  आपण

दाटले मनी जरी गालांवर ना ओघळले
आसवांमध्ये भिजून झालो चिंब ते आपण

आठवणीना दूर लोटुनी पाहतोय भविष्याची स्वप्न
तरीही भूतकाळामध्ये रेगांळूनी अडकलो ते आपण

उष्ण श्वासांनी भरलेले कुठे गेले सारे ते क्षण 
गुंतलेल्या श्वासांमधुनी वेगळे झालो ते आपण

वेगळ्या वाटांनी  जरी आज चालतोय हे जीवन
हरवलं  ते नात शोधतोय तेच ते आपण  
 
यशवंत