Friday, 30 December 2011

हिशोब


चला आता वेळ आली आहे निरोप घेण्याची.. अहो तुमचा निरोप नाही तर ह्या सरत्या वर्षाचा . तुमच्या सोबत तर कायम राहायचं आहे.

 एक वर्ष संपल आणि दुसर वर्ष नवीन संधी घेऊन दारात उभ आहे .त्याच स्वागत तर करायला हव पण त्याअगोदर सरत्या वर्षाचा हिशोब एकदा मांडायला हवा.
हिशोब म्हणजे पैशाचा नाही कारण आजवर तो हिशोब कधी जमलाच नाही. गेल्या वर्षात किती कमावलं आणि किती गमावलं , किती सुख उपभोगल आणि किती दुख सहन केल ,किती माणस जोडली आणि किती माणस तुटली , ह्याचा ताळेबंद तर मांडायलाच हवा.

मागे वळून पाहिल तेव्हा हे वर्ष तस सुख देऊनच गेल, वैयक्तिक प्रगतीच झाली  पण काही आशा अजूनही मनात तशाच राहिल्या आहेत. मनाने सुद्धा अनेकदा निराशेचे सूर गायले परंतु सभोवतालच्या माणसांमुळे लढायची जिद्द अजून आहे.

वर्षभरात मनाला आनंद आणि समाधान मिळवून देणाऱ्या गोष्टी घडून आल्या. काही कविता रचल्या गेल्या , चित्रकलेमध्ये पुन्हा एकदा मन रमु लागल ,छायाचित्रणाची गोडी लागली , ब्लॉग लिहिण्यास सुरुवात केली . नव्याने जोडल्या गेलेल्या मित्र-मंडळीमुळे आणि त्याच्या मार्गदर्शनामुळे सर्व काही घडून आल.

हिशोब पहिला तर जमेच्याच बाजू आहेत सगळ्या पण मनात राहिलेल्या अपूर्ण इच्छाच काय करणार ?? हा प्रश्न सारखा मनाला टोचत आहे. निराशा एखाद्या सुनामीसारखी येते आणि क्षणात स्वप्नाचे सारे बंगले पाण्यात उद्धवस्त करून जाते . वर्ष संपल तर ह्या अपूर्ण इच्छा मागे ठेवून पुढे जायचं का?? नाही अस नाही.. तर पुढल्या वर्षात पूर्ण करण्यासाठी त्यांना पण सोबत घेऊन जायच. जगण्याची लढाई अशीच चालू ठेवायची आहे.

वर्षभरात तुम्ही जो काही प्रतिसाद दिला आणि मार्गदर्शन केल त्याबद्धल मी तुमचे आभार मानतो आणि पुढील वर्ष तुम्हा सर्वाना सुख-समृद्धीचे जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो.

Thursday, 22 December 2011

आयुष्याची समीकरणे


सोडवत आहे एकरेषीय समीकरणे
प्रतलावरती मांडुनी सुखदु:खाचे अक्ष
स्थापिला बिंदू स्वःतचा
सोबतिला जरी असतिल अनेक

                                         बिंदूमधील अंतरे नात्याची
                                         काही जवळ तर काही दूरची
                                         निघाल्या रेषा कापण्यास ही अंतरे
                                         सुखदु:खाच्या अक्षांना छेदती

गवसतील तेव्हा रेषांना
कधी कोन काटकोन त्रिकोण
आणि बदलून जाईल नशीब
मिळेल जेव्हा नवी दिशा नवा दृष्टीकोन

                                        बदलत्या नशीबासोबत बिंदूही सरकत आहे
                                        कधी पुढे-मागे कधी वरती-खालती
                                       असेच करता करता सुटतील समीकरणे
                                       उरतील हाती सुखदु:खाच्या किंमती...

यशवंत....